कुडाळचे सुपुत्र आनंद होडावडेकर यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: March 12, 2026 17:33 PM
views 26  views

सावंतवाडी : मुंबई उच्च न्यायालयाने जलद पदोन्नतीसाठीच्या १० टक्के कोट्यातून जिल्हा न्यायाधीशपदासाठी न्यायिक अधिकाऱ्यांची निवड केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामळेवीर,कुडाळ येथील सुपुत्र न्यायाधीश आनंद भारत होडावडेकर यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली आहे.

आनंद होडावडेकर हे २००८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे न्यायिक सेवेत रुजू झाले.

गेल्या १८ वर्षांत त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांत आपली सेवा बजावली आहे. २०१७ मध्येही त्यांची 'दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर' या पदावर १० टक्के कोट्यातील जलद पदोन्नतीद्वारे नियुक्ती झाली होती. जानेवारी २०१९ ते मे २०२२ या कालावधीत त्यांनी मुंबईतील विधी व न्याय विभाग (मंत्रालय) येथे उपसचिव व उपविधी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते सध्या खेड-राजगुरूनगर (जि. पुणे) येथे कार्यरत आहेत. न्यायाधीश आनंद होडावडेकर हे दिवंगत एसटी कामगार नेते भारत होडावडेकर यांचे सुपुत्र, तर कुडाळ येथील कापड व्यावसायिक योगेश गवंडे यांचे भावोजी, तर वेंगुर्ले येथील व्यावसायिक दिनेश तांडेल यांचे  मेहुणे होत. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.