
कुडाळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, कुडाळ तहसील कार्यालय आवारातून जाणारा वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक: ९ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६:०० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालय कुडाळच्या आवारातून जाणारा वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ ची मतमोजणी वेळी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद मतदार संघ आणि १८ पंचायत समिती निर्वाचन गणांची मतमोजणी कुडाळ तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण १९३ मतदान केंद्रांची मोजणी होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून रस्ता बंद ठेवण्याचे व पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे आदेश दिले आहेत.
मतमोजणीच्या कालावधीत वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावरील वाहनधारकांनी प्रशासनाकडून सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी पूर्ण होताच सदर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.










