
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी मतदारसंघातील प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प सोडला.
देवदर्शनाने प्रचाराचा प्रारंभ
दादा साईल यांनी आज सकाळी पणदूर येथील श्री गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून व नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी आंबडपाल येथील श्री देवी भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "आई भद्रकाली आणि गणरायाचा आशीर्वाद पाठीशी असल्याने विजयाची खात्री आहे," अशी भावना साईल यांनी यावेळी व्यक्त केली.
विकासाचा 'राज्यात नंबर वन' संकल्प
प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर माध्यमांशी बोलताना दादा साईल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की: "मागील पाच वर्षांत या प्रभागात कोणताही ठोस विकास झालेला नाही. जनता परिवर्तनासाठी उत्सुक आहे. मला संधी मिळाल्यास पावशी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून हा प्रभाग राज्यात एक नंबर बनवण्यासाठी मी कटिबद्ध असेन."
विजयाचा आत्मविश्वास
महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, साईल यांनी गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली आहे.










