कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका

शिल्पकार जयेश धुरी यांचा प्रेरणादायी प्रवास
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 02, 2026 14:58 PM
views 371  views

कुडाळ : कुडाळमधील एका हरहुन्नरी कलाकाराने आपल्या कलेच्या जोरावर केवळ कोकणच नव्हे, तर थेट अमेरिकेपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ शिल्पकार जयेश धुरी यांनी गेल्या १० वर्षांपासून शिल्पकलेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे आज त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे. कुडाळ येथे 'शिल्प धाम' या कार्यालयाच्या माध्यमातून ते कोकणातील संस्कृती आणि इतिहासाला मूर्त रूप देत आहेत.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ते आंतरराष्ट्रीय झेप

जयेश धुरी यांचे प्राथमिक शिक्षण कुडाळच्या बॅ. नाथ पै विद्यालय आणि माध्यमिक शिक्षण कुडाळ हायस्कूलमध्ये झाले. कलेची जन्मजात आवड असल्याने त्यांनी रायगड येथील 'आकार पॉट आर्ट'मध्ये दोन वर्षे मातीकामाचे धडे गिरवले. त्यानंतर मुंबई कला महाविद्यालयातून फाउंडेशन आणि प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून शिल्पकलेचे उच्च शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांच्या कलेला तांत्रिक अचूकता आणि अभ्यासू दृष्टिकोन मिळाला.

कोणतेही शिल्प साकारण्यापूर्वी जयेश धुरी त्या विषयाचा सखोल अभ्यास करतात. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध किंवा विविध स्वातंत्र्यसैनिकांचे शिल्प बनवताना ते केवळ आकृती न घडवता, त्या व्यक्तीची देहबोली, भावभावना आणि ऐतिहासिक संदर्भांचा विचार करतात. "शिल्प हे पाहणाऱ्याशी भावनिक नातं जोडणारं असावं," असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

पुरस्कारांनी गौरवलेली कला

त्यांच्या कलेची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने त्यांना प्रथम क्रमांकाचा राज्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच, कोकणातील ४००-५०० वर्षे जुन्या 'देव तरंग' या प्रथेवर आधारित त्यांनी साकारलेल्या कलेसाठी त्यांना 'बी. व्ही. तालिम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोकणातून थेट अमेरिकेपर्यंत मागणी

जयेश धुरी यांनी साकारलेली शिल्पे आज फायबर, मेटल आणि क्ले अशा विविध माध्यमांतून महाराष्ट्रासह परराज्यातही पोहोचली आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच त्यांच्या एका कलाकृतीला अमेरिकेतून मागणी आली असून ती तिथे रवाना झाली आहे. यामुळे कुडाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुढील ध्येय: 'शिल्प धाम' आणि युवा पिढी

कोकणातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जयेश धुरी यांनी वर्षभरापूर्वी 'शिल्प धाम' या स्टुडिओची स्थापना केली. शिल्पकलेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे स्वप्न आहे. भविष्यात कोकणातील पारंपरिक कलांचे जतन करणे आणि तरुण कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. "शिल्पकला हे केवळ माध्यम नसून तो समाजाशी साधलेला संवाद आहे. कोकणच्या मातीतील संस्कार माझ्या कामात नेहमीच दिसून येतील."