
कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आज शुक्रवारपासून या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. कुडाळमध्ये दर शुक्रवारी बाजारपेठ बंद असते. रस्त्यावर वर्दळ कमी असल्याचा फायदा घेत प्रशासनाने आजच या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे कामात कोणताही अडथळा आला नाही आणि वाहतुकीची कोंडी टाळता आली. सध्या बाजारपेठेतील मुख्य मार्गावर डांबरीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.
व्यापारी आणि नागरिकांकडून समाधान
बाजारपेठेतील रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात आणि त्यानंतरही धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान होण्यासोबतच येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यांमुळे चालणे कठीण झाले होते. आता रस्ता सुस्थितीत होणार असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजारपेठ बंद असण्याचा मुहूर्त साधून कामाला गती. या रस्ते दुरुस्तीमुळे कुडाळ शहराच्या आगामी काळात बाजारपेठेतील व्यापार अधिक सुलभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.










