
कुडाळ : कुडाळमध्ये ३० डिसेंबर रोजी पहाटे घडलेल्या दरोडा प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि अपघातात नुकसान झालेल्या वाहनाचे मालक बंड्या सावंत यांनी पोलीस तपासावर आणि दाखल गुन्ह्यातील संशयितांच्या नावांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि प्रत्यक्षात घडलेला घटनाक्रम यात मोठी तफावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बंड्या सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास जेव्हा बॅलेनो गाडीने धडक दिली, तेव्हा त्यातून पाच जण उतरून पळू लागले होते. सावंत यांनी सुजल पवार, सिद्धांत बांदेकर, राहुल शिरसाट आणि मंदार उमळकर यांच्यासह आणखी एक अज्ञात व्यक्ती त्या गाडीत असल्याचे पाहिले. मात्र, दरोड्याच्या गुन्ह्यात संशयितांची नावे वेगळी का आहेत, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. "या अपघातातील संशयित म्हणून ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यांचीच नावे दरोड्याच्या गुन्ह्यात देखील समाविष्ट करावीत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सहभागी असणाऱ्या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात पकडावे," अशी मागणी बंड्या सावंत यांनी केली आहे.










