
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणा-या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हि घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंगुळी भूपकरवाडी नजिकच्या सद्गुरू नगर येथे रस्त्याने चालणा-या एकाला महिलेला मोटरसायकल वरून आलेल्या दोन जणांनी ओळखीचा बहाणा करीत तिला परिसरातील लोकांच्या नावांची ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान मोटरसायकल वरील एकाने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. त्यानंतर त्या दोन्ही इसमांनी मोटारसायकलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहीती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी सतर्क होत त्यांना काही अंतरावर गाठले. त्यावेळी एकजण ग्रामस्थांच्या ताब्यात सापडला. परंतु एकाने त्या ठिकाणाहून पलायन करत शेजारीच असलेल्या जंगलात जाऊन लपला. यावेळी ग्रामस्थानी त्याला देखील शोधून काढले. यानंतर दोघांनाही यथेच्छ चोप दिला. या दोघांनाही कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने पुढील तपास सुरू केला आहे.










