
कुडाळ : तालुका कुडाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, बांबुळी येथील पदवीधर शिक्षिका गायत्री गुरुनाथ धुरी यांच्या गणितीय प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने नेहरू सायन्स सेंटर, वरळी (मुंबई) येथे दि. १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित पश्चिम भारत विज्ञान जत्रा २०२५–२६ साठी त्यांच्या गणितीय प्रतिकृतीची द्वितीत क्रमांक ने निवड करण्यात आली आहे. या विज्ञान जत्रेत पश्चिम भारतातील निवडक राज्यांतील राजस्थान, छत्तीसगड , गोवा, महाराष्ट्र गुजरात, या राज्यातूनउत्कृष्ट प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता.
यापूर्वी दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अमरावती येथे झालेल्या ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात गायत्री धुरी यांच्या गणितीय प्रतिकृतीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. या उल्लेखनीय यशाच्या आधारेच त्यांच्या प्रतिकृतीची पश्चिम भारत विज्ञान जत्रा तसेच राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. नेहरू सायन्स सेंटर, वरळी येथील संचालक मा. उमेश कुमार यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिंदिता मंडोल उपस्थित होत्या.
गायत्री धुरी यांनी सादर केलेली गणितीय प्रतिकृती ही विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना सोप्या, कृतीशील व नाविन्यपूर्ण पद्धतीने समजावून देणारी असल्याने तज्ज्ञ परीक्षकांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात आले. या यशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गायत्री धुरी यांनी शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी तसेच सर्व सहकारी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य सतत लाभत असल्याचे सांगितले. या राष्ट्रीय निवडीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण व संशोधनाधिष्ठित उपक्रम अधोरेखित झाले* असून कुडाळ तालुका व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










