राजमाता जिजाऊ चौकातील ‘तो’ गॅस चेंबर हटवा

शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे कुडाळ नगराध्यक्षांना निवेदन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 16, 2025 16:08 PM
views 115  views

कुडाळ : कुडाळ येथील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकातील धोकादायक MNGL गॅस चेंबर त्वरित हटवण्याबाबत शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर (बांदेकर) यांना निवेदन देण्यात आले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, सदर MNGL गॅस चेंबर त्वरित हटवण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले आहे.

कुडाळमधील जिजाऊ चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या MNGL गॅस चेंबरमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि रहदारीला अडथळा होऊ नये, यासाठी हा चेंबर तिथून हटवणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून, संबंधित विभागाशी चर्चा करून सदर गॅस चेंबर हटवण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने भावना वेळेकर, साईप्रसाद मसगे, किरण कुडाळकर, रमाकांत नाईक मान्यवर उपस्थित होते.