वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ नको, मी माझ्या भूमिकेवर ठाम : राजन तेली

वैभव नाईकांच्या भेटीवर स्पष्टीकरण
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 16, 2025 15:46 PM
views 305  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या भाजप नेते राजन तेली आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर उमटलेल्या प्रतिक्रियांवर आता राजन तेली यांनी अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये, नाईक यांच्याशी झालेली भेट राजकीय नसून वैयक्तिक होती. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार निलेश राणेंशी चर्चा करणार

या सर्व प्रकरणावर आणि आपल्या भूमिकेबद्दल ते लवकरच आमदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधणार आहेत. आपली भूमिका काय आहे आणि त्यामागील विचार काय, हे मी स्वतः आमदार साहेबांशी  बोलून स्पष्ट करणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बँकेचे हित सर्वोच्च

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर आणि त्यातील राजकारणावर भाष्य करताना तेली म्हणाले की, सिंधुदुर्ग बँकेचे हित जपणे हे आमचे देखील काम आहे. बँकेच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितलं.