
कुडाळ : कुडाळ नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ येथील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात आपले स्पष्ट मत मांडले आहे. हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात मंजूर झाला असला तरी, नागरिकांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन आपण त्याचे उद्घाटन केले नाही किंवा तो सुरू करण्यासाठी कोणतीही विट ही लावली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
शिरसाट यांनी सांगितले की, घनकचरा प्रकल्पाला लोकांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे नागरिकांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन हा प्रकल्प सध्याच्या जागेवर सुरू न करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, "लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन त्या प्रकल्पासाठी अन्यत्र कुठे जागा मिळते का यासाठी मी प्रयत्नशील होतो."
दरम्यानच्या काळात सत्ता बदल झाल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याचे किंवा त्यावरील पुढील काम तसेच राहिले. या प्रकल्पाला आपला पूर्वीही विरोध होता आणि यापुढेही राहील, अशी ठाम भूमिका नगरसेवक मंदार शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केली.
सध्याच्या जागेवरील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, हा प्रकल्प तेथे करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असे मत शिरसाट यांनी मांडले आहे.










