
कुडाळ : कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी घनकचरा प्रकल्पाबाबतच्या विषयावर प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी उपनगराध्यक्ष शिंदे आणि नगरसेवक शिरसाट यांच्यावरच थेट सवाल उपस्थित केला आहे. नगराध्यक्षा बांदेकर म्हणाल्या की, "ज्या प्रकल्पाला आज नगरसेवक मंदार शिरसाट विरोध करत आहेत, तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजेच २०२२ मध्ये मंजूर झाला होता. मग आता ते विरोध का करत आहेत?" असा प्रश्न नगराध्यक्षांनी उपस्थित केला आहे.
आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना डेमो (प्रात्यक्षिक) दाखवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, नगराध्यक्षा बांदेकर यांनी स्पष्टीकरण दिले की, "आमदार साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे, त्याच दिवशी नगरपंचायत कर्मचारी आणि मी स्वतः एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे थांबून ज्या ग्रामस्थांच्या मनात प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत वाट पाहिली होती. मात्र, संध्याकाळी ग्रामस्थ आलेच नाहीत," असे त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी ग्रामस्थांना आणि प्रकल्प विरोधकांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, "या प्रकल्पाबाबत कोणतीही शंका मनात ठेवू नका. या प्रकल्पाचा उद्देश चांगला आहे. त्याची माहिती घ्या आणि मगच विरोध करा. या प्रकल्पातून कचरा विघटन होऊन शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागतील."
त्यांनी पुढे अशीही ग्वाही दिली की, "यापुढेदेखील नागरिक जेव्हा म्हणतील, तेव्हा आम्ही या प्रकल्पाचा डेमो दाखवण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे कोणीही मनात शंका न ठेवता, प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घ्यावी," अशी विनंती त्यांनी केली आहे.










