कुडाळ एमआयडीसी घनकचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

उपनगराध्यक्ष किरण शिंदे उपोषणात सहभागी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 10, 2025 12:34 PM
views 368  views

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कुडाळ येथील एमआयडीसीमधील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला आता एमआयडीसीतील रहिवासी आणि उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनीही या प्रकल्पाविरोधातील उपोषणात सहभाग घेतल्यामुळे  या विषयाला वेगळं प्राप्त होत आहे.

हा घनकचरा प्रकल्प ज्या जागेवर उभारला जात आहे, ती जागा मध्यस्थानी असल्याने तिच्या आजूबाजूला असलेल्या महाविद्यालये आणि इतर प्रकल्पांना भविष्यात प्रदूषणाचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे, अशी भीती रहिवासी आणि उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

सुरुवातीला प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, तेव्हा कुडाळ शहराची कचरा समस्या सुटेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, नगरपंचायतीच्या या प्रकल्पाला एमआयडीसीतून कडाडून विरोध होत आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी, आमदार राणे यांनी ग्रामस्थांना या प्रकल्पातून कोणतीही हानी पोहोचणार नाही आणि प्रकल्पाचे स्वरूप वेगळे आहे, असे आश्वासन दिले होते.

मात्र, नगरपंचायतीने आम्हाला प्रकल्पाचा कोणताही प्रात्यक्षिक दाखवला नाही, त्यामुळे आम्ही उपोषण करत आहोत, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. या गंभीर परिस्थितीत नगरपंचायत प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा होऊन हा वाद कधी मिटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.