
कुडाळ : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कुडाळ वासियांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या हुमरमळा, पणदूर व वेताळ बांबर्डे येथील महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. महामार्ग ठेकेदाराने युद्ध पातळीवर हे काम सुरू केले आहे.
'कोकण साद लाईव्ह'ने यापूर्वी वारंवार या खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मागील अनेक वेळा ठेकेदार जागेवर अनुपस्थित असताना कामे निकृष्ट होत असल्याची तक्रार होती. मात्र, यावेळेस परिस्थिती वेगळी दिसत आहे. ठेकेदाराची उपस्थिती: संबंधित ठेकेदार स्वतः जागेवर उपस्थित राहून काम योग्य प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.
दुरुस्तीचे स्वरूप
ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, खड्डे बुजवण्यासाठी रस्त्याच्या स्वरूपानुसार योग्य मटेरियलचा वापर केला जात आहे. डांबरीकरण असलेल्या ठिकाणी डांबरी मटेरियल वापरले जाणार आहे. काँक्रिट असलेल्या रस्त्यांवर काँक्रिट मटेरियलचा वापर केला जाणार आहे.
प्रवासातील अडथळे होणार दूर ?
दीर्घकाळापासून खड्ड्यांच्या समस्येने महामार्गावर प्रवास करणे धोकादायक बनले होते. अपघातांसह वाहनांचे नुकसान आणि वेळेचा अपव्यय यामुळे प्रवासी त्रस्त होते. या दुरुस्तीच्या कामामुळे यापुढे तरी निदान कुडाळ महामार्गावरचे खड्डे बुजून लोकांचा प्रवास सुखकर होऊ शकेल, अशी आशा जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रवाशांनी व्यक्त केलेली ही आशा पूर्ण करून ठेकेदाराने गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा आहे.










