
कुडाळ : कुडाळ-मालवण मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला तातडीने 'जाग' आणण्यासाठी उद्या, दि. ०४ नोव्हेंबर रोजी जन आंदोलन पुकारण्यात आले आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नेरूर जकात नाका ते होबीळीचे माळ या दरम्यान हे आंदोलन करण्यात येणार आहे.
कुडाळ-मालवण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने होणारे अपघात आणि प्रवासातील गैरसोय यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हे तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. रस्त्यांची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आंदोलक करत आहेत.
उद्या, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नेरूर जकात नाका ते होबीळीचे माळ येथे जन आंदोलनात परिसरातील सर्व नागरिक, वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्यांची दुरवस्था दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
   
                    
   


 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



               



