
कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी एका फोन कॉलवर एका गरजू रुग्णाच्या उपचाराचे तब्बल ८ लाख रुपये माफ करवून, कोकणी माणसासाठी ते पुन्हा एकदा 'देवदूत' ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील रहिवासी असलेले रामचंद्र सत्यवान सावंत (सध्या राहणार विरार) या तरुणाला अचानक अत्यवस्थ वाटू लागल्याने त्याला मीरारोड येथील एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुमारे ८ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
उपचारानंतर हॉस्पिटलचे बिल पाहून सावंत कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ८ दिवसांचे बिल तब्बल ११ लाख रुपये एवढे आले. इतकी मोठी रक्कम भरण्याची कुटुंबीयांची परिस्थिती नव्हती. काय करावं काहीच सुचेनासे झाले असताना, त्यांना पहिली आठवण झाली ती आमदार निलेश राणे यांची.
सावंत कुटुंबीयांनी तत्काळ युवासेनेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा सावंत यांना ही गोष्ट सांगितली. बाळा सावंत यांनीही विलंब न लावता ही गंभीर बाब आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातली.
आमदार निलेश राणे यांनी तत्काळ या समस्येची दखल घेतली. राणे मेडिकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी स्वतः या प्रकरणात पाठपुरावा केला. त्यांनी तातडीने हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून चर्चा केली आणि रुग्ण सावंत कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बिलामध्ये सवलत देण्याची विनंती केली.
आमदार निलेश राणे यांच्या एका प्रयत्नामुळे हॉस्पिटल प्रशासनाने रामचंद्र सावंत यांच्या बिलातील तब्बल ८ लाख रुपये माफ केले! ११ लाखांचे बिल केवळ ३ लाखांवर आल्यामुळे सावंत कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांच्यावरील मोठे आर्थिक संकट टळले. या मदतीनंतर रामचंद्र सावंत यांच्या कुटुंबीयांनी आमदार निलेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. राणे कुटुंबीय कोकणी माणसांसाठी नेहमीच धावून येतात, याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा आला आहे.










