
कुडाळ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व महाविद्यालयाची भूमिका या विषयावर आधारित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला शनिवारी कुडाळ येथे प्रारंभ झाला. या कार्यशाळेत राज्यातील विविध विद्यापीठांमधील सुमारे १५० प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनासाठी राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात सुरु असलेल्या करिअर कट्टा उपक्रमाचाच हा एक भाग असून या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. रवींद्र साठे (सभापती – राज्यमंत्री दर्जा), महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाला मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र), प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, प्रा. डॉ. स्मिता सुरवसे (जिल्हा प्राचार्य प्रवर्तक), प्रा. समीर तारी (पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगाव),डॉ. अजित दिघे (सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा समन्वयक) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. यशवंत शितोळे यांनी केले. तर अध्यक्षीय भाषण प्रा. डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक मा. रवींद्र साठे यांनी PPT च्या माध्यमातून मधु केंद्र योजना, मधमाशांसाठी उपयुक्त वृक्ष-वनस्पती व खादी-ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेचा उद्देश, अनुभव आणि उपयुक्तता याबाबत प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्जन्या अंजूटगी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बबन सिंगारे यांनी केले. यानंतर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचा यशस्वी समारोप करण्यात आला.










