
कुडाळ : येथील घावनळे-भुईवाडा परिसरात महावितरणच्या तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का (शॉक) लागून मुऱ्हा जातीच्या गाभण म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता घडली. शेतकरी भालचंद्र अनंत सावंत यांच्या मालकीची ही मुऱ्हा म्हैस होती. या घटनेमुळे शेतकरी सावंत यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी भालचंद्र सावंत यांची दुधाळ आणि गाभण असलेली मुऱ्हा जातीची म्हैस शेत चरत असताना, अचानक तुटून खाली पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेच्या संपर्कात आली. विजेचा तीव्र धक्का बसल्याने म्हशीचा तत्काळ मृत्यू झाला. दूध देणारी मुऱ्हा म्हैस गमावल्याने सावंत कुटुंबावर मोठे संकट आले आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरण (MSEB) कंपनीचे अधिकारी, कुडाळ पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत म्हशीचा पंचनामा केला व घटनेची सविस्तर नोंद घेतली. विशेष म्हणजे, महावितरणच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकरी भालचंद्र सावंत यांना झालेल्या नुकसानीपोटी नियमानुसार नुकसान भरपाई देण्याची लेखी/तोंडी हमी दिली आहे.
महावितरणने या घटनेची गंभीर दखल घेऊन तुटलेल्या तारांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाने केली आहे.










