सिंधुदुर्गातील अवकाळीग्रस्त भातशेतीला तातडीने भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 25, 2025 17:54 PM
views 21  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, जमीनदोस्त झालेल्या भात पिकाला कोंब फुटले आहेत. या गंभीर नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना भातशेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी.अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

वैभव नाईक यांनी पत्रात नमूद केले आहे की, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळजन्य स्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे.सध्या भातपीक काढणीच्या अवस्थेत असून, या पावसामुळे उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने खाली कोसळलेल्या आणि काही ठिकाणी उभ्या असलेल्या भात पिकालाही कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे.

पेरणीच्या हंगामापासून नुकसान 

यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने, पेरणीच्या हंगामाआधीच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी निम्मेच पीक उगवले होते. परिणामी, शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात भातशेती केली. तसेच, १०० ते १३० दिवसांचा कालावधी उलटूनही १५० दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने काढणीचा कालावधीही लांबला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन त्यांना आर्थिक आधार देण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे.