
कुडाळ : वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीसाठी कुडाळमधील बाजारपेठा उत्साहाने नटल्या आहेत. सर्वत्र खरेदीसाठी लागणाऱ्या वस्तूंची रेलचेल असून, बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी जय्यत तयारी केली आहे.
बाजारपेठेत सर्वत्र आकाश कंदील, आकर्षक दिव्याच्या पणत्या, विविध प्रकारची रांगोळी आणि तिचे साचे, सुगंधी उटणे, नरकासुराचे मुखवटे तसेच दिवाळीचा फराळ यांसारख्या असंख्य वस्तूंचे स्टॉल्स लागलेले आहेत. रंगीबेरंगी वस्तूंनी बाजारपेठ खचाखच भरली असून, सर्वत्र दिवाळीचा उत्साह जाणवत आहे.
मात्र, यंदाच्या वर्षी बाजारपेठ सजली असतानाही ग्राहक हवे तसे मिळत नसल्याने दुकानदारांमध्ये थोडीशी नाराजी दिसत आहे. मुख्य सण असूनही ग्राहक खरेदीसाठी अपेक्षित गर्दी करत नसल्यामुळे, यंदा दिवाळी गोड होण्याची चिन्हे दिसत नसल्याची चिंता दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.