
कुडाळ : कुडाळ न.पं. सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभेचे कामकाज पार पडले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर फिरणा-या मोकाट गुरांमुळे वाहनधारक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मोकाट गुरांच्या मालकांना न.पं. प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. परंतू मालकांनी अद्यापपर्यंत रस्त्यांवर गुरे सोडणे बंद केलेले नाही. मोकाट गुरांना बांधून ठेवण्यासाठी न.पं. कडे अधिकृत कोंडवाडा तसेच कोंडवाडा रक्षकाची नियुक्ती नाही. त्यामुळे ही मोकाट गुरे पकडून शो शाळांमध्ये पाठवून, नंतर दहा दिवसांनी त्या गुरांबाबत लिलाव प्रकियेची कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
शहरातील अनधिकृत होर्डिग्ज, फ्लेक्स, बॅनर्सवर कारवाई करण्यात येईल. एमआयडीसीच्या नवीन रस्त्यांवर लावण्यात आलेल्या पथदिपांच्या पोलांवर कोणीही बॅनर्स लावू नयेत, लावण्यास तात्काळ हटविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. ज्यांना शहरात होर्डिग्ज, फ्लेक्स, बॅनर्स लावायचे असतील त्यांनी न.पं. ची रितसर परवानगी घेऊन, त्यावर क्यु आर कोड लावणे बंधनकारक असल्याचे सीईओंनी यावेळी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन तर्गत विविध प्रकल्पांची पाहणी करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी पणजी, कराड, पाचगणी आणि इंदौर अशी ठिकाणे चर्चेत घेण्यात आली. शासनाकडून नमो उद्यान विकसित करण्यासाठी नगरपंचायतीला एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या उद्यानासाठी शहरातील शासनाच्या तसेच न.पं. च्या जागांची पाहणी करून जागा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. सभेला नगरसेवक विलास कुडाळकर, अभी गावडे, उदय मांजरेकर, निलेश परब, अॅड.राजीव कुडाळकर, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, नगरसेविका अक्षता खटावकर, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर आदी उपस्थित होते.