
कुडाळ : काही दिवसांपूर्वी शिरोडा-वेळागर येथील समुद्रात बुडून पिंगुळी गुढीपूर येथील मनियार कुटुंबातील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अत्यंत दुःखद घटनेनंतर कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मनियार कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला आधार दिला.
या दुःखद प्रसंगी मनियार कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. त्यांनी शोकाकुल कुटुंबाला धीर दिला आणि या कठीण काळात त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील मनियार कुटुंबाला भेटून सहवेदना व्यक्त केली.
शिरोडा-वेळागर येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आमदार निलेश राणे यांनी स्वतः मनियार कुटुंबाला भेटून दिलेला आधार हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे.










