कुडाळ शहरातील सेफ्टी मिररची दुरवस्था

अपघातांचे भय वाढले
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 12, 2025 19:59 PM
views 61  views

कुडाळ : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नगरपंचायतीने दोन वर्षांपूर्वी आतील रस्त्यांवर लावलेले सेफ्टी मिरर (बहिर्वक्र भिंग) सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना अपघाताचे भय सतावत आहे.

शहरातील अरुंद आणि वळणांवर असलेल्या रस्त्यांवर वाहनचालकांना पुढील वाहनांचा अंदाज येऊन अपघात टाळता यावेत, या उद्देशाने नगरपंचायतीने महत्त्वाच्या ठिकाणी सेफ्टी मिरर बसवले होते. या मिररमुळे वाहनचालकांना दृष्टीस न पडणाऱ्या भागातील वाहतुकीचा अंदाज येत असल्याने अपघात टळत होते.

मात्र, कालांतराने या मिररकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी हे सेफ्टी मिरर खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी त्यांची दिशा बदलली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, कुडाळ शहरातील काळप नाका, बॉक्सवेल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी लावलेल्या मिररवर धूळ साचली आहे. धूळ साचल्यामुळे या मिररमधून काहीही स्पष्ट दिसत नाही.

सेफ्टी मिररचा उपयोग होत नसल्यामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा अंदाज घेत सावधगिरीने गाडी चालवावी लागत आहे. विशेषतः नवख्या वाहनचालकांसाठी तसेच वळणांवर अपघाताचा धोका वाढला आहे. नगरपंचायतीने तातडीने या सेफ्टी मिररची दुरुस्ती करावी, धूळ साचलेल्या मिररची साफसफाई करावी आणि आवश्यकतेनुसार त्यांची जागा निश्चित करावी, अशी मागणी शहरातील नागरिक आणि वाहनचालक करत आहेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.