कुडाळमध्ये नगरपंचायतच्या अतिक्रमण हटाव मोहीमेबाबत संमिश्र प्रतिक्रिया

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 10, 2025 20:53 PM
views 366  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीतर्फे १० ऑक्टोबर रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली, परंतु ही मोहीम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाली नाही. नगरपंचायतीच्या या अर्धवट कारवाईमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

अतिक्रमण करणाऱ्या सर्व स्टॉलधारकांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. असे असूनही, बाजारपेठेतील बरेच स्टॉल जैसे थे असल्याचे दिसून आले. नगरपंचायतीचे कर्मचारी प्रत्यक्ष कारवाईसाठी सायंकाळी ४:३० च्या सुमारास बाहेर पडले. उशिरा सुरुवात झाल्यामुळे नगरपंचायतीला संपूर्ण बाजारपेठेतील अतिक्रमणे एका दिवसात पूर्णपणे हटवता आली नाहीत. ही कारवाई अपूर्ण राहिली.

या मोहिमेत नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केवळ गटारांवर केलेली अतिक्रमणे हटवण्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र, मुख्य आणि मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानाचा अर्धा भाग दुकानाच्या मूळ जागेपेक्षा बाहेर थाटलेला आहे. अशा गंभीर अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे, ही मोहीम केवळ 'दाखवण्यापुरती' होती का? असा प्रश्न सामान्य नागरिक आणि काही व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे. नगरपंचायतीने मोठ्या अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कुडाळमधील नागरिकांकडून केली जात आहे.