
कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजन तेली यांना सोबत घेऊन काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तेली यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना कोणताही पश्चात्ताप वाटू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. राणे यांनी स्पष्ट केले की, आगामी नगरपंचायत आणि इतर निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. "राजन तेली यांची जी ओळख आहे, जो जनसंपर्क आहे, त्याचा फायदा आपण सर्वांनी करून घेणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.
युतीबद्दल काय म्हणाले राणे ?
शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना निलेश राणे यांनी, "युती होईल नाही होईल, हा पुढचा विषय आहे. पण तुम्ही तुमच्या कामाला लागा," असा स्पष्ट सल्ला कार्यकर्त्यांना दिला. युतीच्या निर्णयाची वाट न पाहता, सर्वांनी आपापल्या स्तरावर निवडणुकीच्या तयारीला लागून पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजन तेली यांना सामावून घेत सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.










