
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कुडाळ शहराच्या विविध विकासकामांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, तसेच नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर, आणि चांदणी कांबळी हे शिष्टमंडळात उपस्थित होते.
या चर्चेमध्ये प्रामुख्याने नगरपंचायतीची नवीन इमारत, आधुनिक मच्छी मार्केट आणि कचरा प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. शहराच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
या सदिच्छा भेटीमध्ये कुडाळ शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय सहकार्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. भेटीच्या वेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.










