कुडाळ - मालवण तालुक्यात १८ नवीन ट्रान्सफार्मर मंजूर

वीजपुरवठा होणार अधिक सक्षम
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 07, 2025 11:05 AM
views 129  views

कुडाळ : कुडाळ आणि मालवण तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या दोन्ही तालुक्यांतील कमी दाबाने वीजपुरवठा होत असलेल्या भागांत विजेची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी १८ नवीन ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यासंबंधीची माहिती दिली.

कुडाळ व मालवण तालुक्यांसाठी मंजूर झालेल्या या १८ ट्रान्सफार्मरच्या कामांमुळे अनेक गावांमध्ये सुधारित वीजपुरवठा होणार आहे. यामध्ये खालील प्रमुख ठिकाणे समाविष्ट आहेत: कुडाळ तालुका: डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, आचरा हिर्लेवाडी, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपुर, वालावल आर्कचापूल, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, जांभवडे कुंभारवाडी, मांडकुली भोईवाडी, निवजे, कसाल बाजारपेठ, आंबेरी गोसावीवाडी, वेताळ बांबर्डे कदम वाडी. मालवण तालुका: मालवण धुरीवाडा, चेंदवन वेलवाडी.

या ट्रान्सफार्मरमुळे या भागांतील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार असून वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठा समस्येतून नागरिकांची सुटका होणार आहे.

राणे यांच्या प्रयत्नांना यश

कुडाळ-मालवण तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार आमदार निलेश राणे यांच्याकडे या नवीन ट्रान्सफार्मरची मागणी करण्यात आली होती. नागरिकांची ही निकड ओळखून आमदार राणे यांनी तातडीने पाठपुरावा करत जिल्हा वार्षिक योजनेतून या १८ कामांना निधी मंजूर करून घेतला आहे. वीज यंत्रणा बळकट करण्यासाठी ते तत्पर असून, लवकरच उर्वरित आवश्यक कामांनाही मंजुरी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली. या निर्णयामुळे ग्रामस्थांनी आणि वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.