
कुडाळ : कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीसाठी ६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ शहरातील सर्वच्या सर्व १७ प्रभागांच्या विकासकामांसाठी हा निधी मंजूर झाला असून यामध्ये रस्ते, गटार, गणेश घाट, सोलर हायमास्ट, संरक्षक भिंत, स्मशानभूमीतील, चार्जिंग स्टेशन अनुषंगिक कामे आदी विकासकामांचा सामावेश आहे. उर्वरित विकासकामांसाठी लागणार निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.
कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर - शिरवलकर यांनी शहरातील विविध विकासकामांसाठी आ. निलेश राणे यांच्याकडे भरघोस निधीची मागणी केली होती. त्यानुसार शहरातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास पायाभूत व मूलभूत सोई सुविधा अशा एकूण ६८ विकासकामांसाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. आ. निलेश राणे यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे नगरोत्थान जिल्हास्तर २०२५ अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीला तब्बल ६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ नगरपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भरघोस निधी प्राप्त झाल्यामुळे कुडाळ वासियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.










