नायब सुभेदार सुनिल सुर्वे यांचा सत्कार

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 03, 2025 10:52 AM
views 264  views

कुडाळ : भारतीय सैन्य दलात गेली २४ वर्षे देश सेवा अर्पण करणा-या कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी येथील नायब सुभेदार सुनिल सुरेश सुर्वे यांचे गुरूवारी पणदूर तिठा येथे सुर्वेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पणदूरहून डिगस पर्यंत मोटरसायकल रॅली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच सत्कारही करण्यात आला.

डिगस गावचे सुपुत्र सुनिल सुर्वे सन २००१ मध्ये भारतीय सैन्य दलात रूजू झाले. गेली २४ वर्षे त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून देशसेवा केली. पंजाब, काश्मीर, राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाना, आसाम, झाशी अशा अनेक ठिकाणी देशाच्या सीमेवर देश रक्षसाणाठी सेवा केली. नायब सुभेदार म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. सध्या ते पुणे येथील आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये कार्यरत होते. या ठिकाणाहून ते सेवानिवृत्त झाले. गुरूवारी सायंकाळी ते पणदूरतिठा येथे दाखल होताच डिगस सुर्वेवाडी ग्रामस्थ आणि जयभवानी उत्कर्ष मंडळाच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुष्पहार घालून, पुष्पगुच्छ देऊन तसेच पणदूर येथून डिगस श्री कालिका मंदीर ते सुर्वेवाडी अशी मोटरसायकल रॅली काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच फुलांचा वर्षाव आणि औक्षण करून गौरवास्पद सत्कारही करण्यात आला. देशसेवा करून सुखरूप घरी परतल्याचा आनंद कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला.  यावेळी सुरेश सर्वे, सौ.सावली सुर्वे, अनंत सुर्वे, प्रकाश सुर्वे, मोहन सुर्वे, विष्णू सुर्वे, अशोक सुर्वे, अतुल सुर्वे, अमित सुर्वे, विशाल गायकवाड, हर्षद थवी, नामदेव चोरगे, शरद सुर्वे, वसंत कदम, विलास सुर्वे, पारस सुर्वे, गोट्या सुर्वे, ओंकार सुर्वे, अक्षय सुर्वे, प्रणव सुर्वे, चैतन्य गायकवाड, आयुष सुर्वे, संस्कार सुर्वे, वामन धावले, विठू पालव, आपा चव्हाण, महेश कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.