
कुडाळ : दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या विद्यमाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत "निक्षय मित्र" हा महत्वाचा उपक्रम महिला रुग्णालय, कुडाळ येथे पार पडला. समाजाच्या आरोग्यविषयक जबाबदारीची जाणीव ठेवत रोटरी क्लबने गरजू क्षयरुग्णांना पोषण आहाराचे फूड बास्केट वाटप करून त्यांच्यासाठी आधार देण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉ. संजय वाळके विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी रुग्णांना क्षयरोगावर नियमित औषधोपचार घेणे, पोषणयुक्त आहाराचे महत्व आणि रोगाशी झुंज देताना मानसिक बळ मिळविण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. राजीव पवार, सचिव रो. मकरंद नाईक, रो. शशिकांत चव्हाण, रो. दिनेश आजगावकर, रो. रवींद्र परब यांच्यासह क्लबचे इतर सर्व सदस्य सक्रीय सहभागी झाले होते. याशिवाय डॉ. मोनालीसा वजराटकर, डॉ. सुशांता कुळकर्णी यांचीही उपस्थिती लाभली. महिला रुग्णालयातील कर्मचारीवर्ग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आणि लाभार्थी रुग्ण यांच्याही उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.
रोटरी क्लबने दिलेल्या फूड बास्केटमध्ये जीवनसत्वांनी समृद्ध धान्य, कडधान्ये, तेल, पोषक पदार्थ अशा वस्तूंचा समावेश होता. क्षयरोगी रुग्णांच्या उपचारांमध्ये योग्य पोषणाची महत्त्वाची भूमिका असल्याने हा उपक्रम रुग्णांच्या आरोग्य पुनर्बांधणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने रोटरी क्लब ऑफ कुडाळचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांनी समाजातील जबाबदारीची जाण ठेवून गरजू रुग्णांसाठी सातत्याने कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. राजीव पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “क्षयरोग हा अजूनही समाजासाठी एक मोठे आव्हान आहे. या रोगावर मात करण्यासाठी केवळ औषधेच नाहीत तर योग्य पोषण, सकारात्मक दृष्टीकोन आणि समाजाचा आधार आवश्यक आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना केवळ वस्तू देत नाही, तर त्यांना समाजाच्या पाठिंब्याचा दिलासा देत आहोत.”
या उपक्रमामुळे क्षयरोग निर्मूलन मोहिमेला बळ मिळून समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. लाभार्थी रुग्णांनीही मनःपूर्वक आभार व्यक्त करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे त्यांना उपचार घेण्यासाठी नवे बळ मिळत असल्याचे सांगितले.
रोटरी क्लब ऑफ कुडाळने यापूर्वीही रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साधनसामग्रीचे वाटप, पर्यावरणपूरक उपक्रम आदी सामाजिक कार्ये सातत्याने केली आहेत. “निक्षय मित्र” कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात केलेले हे योगदान रोटरी क्लबच्या सेवाभावाचे आणखी एक मोठे उदाहरण ठरले आहे.










