
कुडाळ : नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि शेड्स हटविण्यासाठी नगरपंचायतीने जाहीर सूचना काढून ७ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ८ तारखेला कोणतीही पूर्वसूचना न देता धडक कारवाई करण्यात येणार असून ही अतिक्रमणे काढण्यात येतील व जप्त केली जातील, असा इशारा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.
कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी आस्थापना, विक्रेते, व्यापारी आणि व्यावसायिकांनी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे केलेली आहेत किंवा रस्त्याचा भाग व्यापलेला आहे. नगरपंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे निर्देशनास आल्यामुळे सर्व संबंधित अतिक्रमण धारकांनी पुढील सात दिवसांच्या आत अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि शेड्स पूर्णपणे स्वतःहून काढून घ्यावीत, असे या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. या ७ दिवसांच्या मुदतीत नगरपंचायतीच्या आदेशाचे पालन न केल्यास नगरपंचायत कोणतीही पूर्वसूचना न देता ही अतिक्रमणे बळाचा वापर करून काढून टाकेल आणि ते साहित्य जप्त करेल. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.










