शाळा तिथे दाखला उपक्रमाला प्रतिसाद

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 29, 2025 17:52 PM
views 107  views

कुडाळ : सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत 'शाळा तिथे दाखला'  उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला कुडाळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दाखले वितरण शाळा शाळांमधून होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचत आहे. विद्यार्थ्यांना वितरित केलेले दाखले महत्वाचे आहेत, ते सांभाळून ठेवा असे आवाहन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री. वसावे बोलत होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने एकूण ४९ दाखले विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. 

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यात 'शाळा तिथे दाखला' उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज  क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, संस्थेचे पदाधिकारी सीए सागर तेली, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. कामत, शिक्षिका श्रीमती खानोलकर, श्रीमती पडते, श्रीमती गोवेकर, श्रीमती जोशी, श्रीमती बंकापूरे, श्री. रासम, महसुल विभागाचे  श्री. गोसावी उपस्थित होते.  यावेळी ५ जातीचे आणि ४४ वय अधिवास अशा एकूण ४९ दाखल्यांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले. 

यावेळी बोलताना तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी सेवा पंधरवड्यात राबविण्यात जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. हे दाखले पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी महत्वाचे आहेत. ते सांभाळून ठेवा. प्रशासनाच्या वतीने तुम्हाला शाळेत येऊन हे दाखले वितरित केले जात असल्याने तुमचा वेळ वाचतो आहे. तो वेळ अभ्यास करण्यासाठी घालवा, असे आवाहन तहसीलदार श्री. वसावे यांनी केले. या कमी शाळेच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका एस. एस. कामत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती जोशी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री. रासम यांनी केले.