नेमळे तिठ्यावर गोवा बनावटीच्या दारूसह १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 23, 2025 11:48 AM
views 1106  views

कुडाळ :  मुंबई गोवा महामार्गावर नेमळे तिठा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कारवाई केली. मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये दोन दुचाकींसह तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

मंगळवारी सायंकाळी अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणने मुंबई गोवा महामार्गावर नेमळे तिठा येथे दांड्याचे गाळू येथील सर्विस रोडवर कारवाई केली. या कारवाईमध्ये एक एक्टिवा, एक ज्युपिटर व गोवा बनावटीची दारू असा एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मिथुन मंगेश फाटक (वय. २९, रा. कट्टा, मालवण)  आणि महेश शामराव महांकाळ (वय. ५०, रा. तोंडवळी, मालवण) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार, पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केली.