
कुडाळ : कुपवडे - बौद्धवाडीकडे जाणा-या रस्त्याच्या मागणीसाठी वारंवार प्रशानाचे लक्ष वेधूनही अद्यापपर्यंत कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यासाठी सोमवारी कुपवडे बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी केले.
तालुक्यातील कुपवडे गावातील बौद्धवाडी ही २६ घरांची वस्ती आहे. आमची वस्ती गाव, ग्रामपंचायत व तालुक्याला जोडणार्या रस्त्यापासून वंचित आहे. श्री होळबादेवी मंदिराकडून आमच्या वस्तीकडे जाणारी परंपरागत पायवाट आहे. आमच्या वस्तीतील बांधव आजपावेतो याच पायवाटेचा उपयोग करीत आहेत. श्री होळबादेवी मंदिराकडे जाणार्या रस्त्यापासून आमच्या वस्तीकडे जाणारा रस्ता नसल्याने आमच्या वस्तीतील बांधव अनेक अर्थाने विकासापासून वंचित आहेतच. शिवाय वस्तीतील बांधवांना अनेक प्रसंगी हाल सोसावे लागतात. विशेषतः आजारी व्यक्ती, गरोदर स्त्रीया यांना वैद्यकीय उपचारासाठी बाहेर तालुक्याला न्यायचे असेल कसरत करीत मुख्य रस्त्याला आणावे लागते. आम्ही गेली पंचवीस वर्षे सरकार, प्रशासनाकडे अर्ज - निवेदने देवून परंपरागत पायवाटेवरून कायमस्वरूपी पक्का रस्ता करून आमच्या बौद्धवाडीतील बांधवांना रस्त्यावरून ज्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत त्यातून सुटका करावी आणि आमच्या वस्तीच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती करीत आहोत मात्र सरकार व आपणाकडून केवळ आश्वासनेच मिळत राहिली.
प्रशासनाकडून तर आमचे अर्ज - विनंत्या एका कार्यालयाकडून दुसर्या कार्यालयाकडे पाठवत आमच्या मुलभूत मागणीशी खेळ केला जात आहे, असे यावेळी ग्रामस्थ म्हणाले. कविता जाधव, मानसी तांबे, श्रुती सकपाळ, प्रज्ञा सकपाळ, रोहन तांबे, राजन तांबे, प्रविण सकपाळ, प्रभाकर तांबे चांगदेव तांबे, सुनील तांबे, विकास तांबे, सत्यवान कदम, गणपत कदम, भालचंद्र सकपाळ, सखाराम तांबे, सरिता कदम, राजश्री तांबे, दिप्ती तांबे, पुजा जाधव, हर्षदा जाधव, यांच्यासह बौद्धवाडीतील ग्रामस्थ सहभाग झाले होते.
श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपद देसाई, दि बुद्धीष्ट फेडरेशनचे अंकुश कदम, मधुकर तळवणेकर, सत्यशोधक समाज संघटनेचे दिपक जाधव, जयभीम युवक मंडळ कुडाळचे प्रसाद कुडाळकर, भूषण कुडाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध हितवर्धक महासंघाचे अनिल पावसकर, सहदेव कदम, मीना पवार यांनी या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक आश्वासन तहसीलदारांनी दिले. यावेळी बीडीओ प्रफुल्ल वालावलकर व ग्राम पंचायत अधिकारी उपस्थित होते. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर दुपारी उपोषण स्थगित करण्यात आले.










