
कुडाळ : शहरातील पान बाजार परिसरात ध्वनीवर्धकाद्वारे ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हुसेन जैनुद्दीन मुजावर (वय ४८) असे आरोपीचे नाव असून, त्यांनी बाबाचाँद मशिदीवरील ध्वनीक्षेपक परवान्याच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५:२० वाजता मुजावर यांनी मशिदीवरील अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाची मर्यादा ओलांडली. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांनुसार मिळालेल्या परवान्याच्या अटींचा हा भंग आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दयानंद वसंत चव्हाण यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात मुजावर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, कलम ३३(r)(iii) आणि १३१ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हे पाऊल ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.










