
कुडाळ : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवले जात आहे. या अभियानांतर्गत, कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी, तसेच नेत्र आणि दंत तपासणी केली जाईल. गर्भवती मातांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी आणि लसीकरण यांसारख्या सेवाही उपलब्ध असतील. याशिवाय, महिला व बालकांसाठी पोषण सत्रे, योग शिबिरे, क्षयरोग तपासणी, रक्तदान, अवयवदान प्रतिज्ञा आणि व्यसनमुक्तीविषयी जागरूकता सत्रे आयोजित केली जातील. किशोरवयीन आरोग्य सत्रे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरेही घेण्यात येणार आहेत. आयुष्मान भारत, वय वंदना कार्ड, आणि आभा कार्ड तयार करण्याचे शिबिरही येथे असेल.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाळके यांनी कुडाळ तालुक्यातील महिला आणि बालकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
शिबिरांचे वेळापत्रक :
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ: २३ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत.
ग्रामीण रुग्णालय, कुडाळ: २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत.










