
कुडाळ : केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना जगाचे आणि व्यवहाराचे ज्ञान असणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना जात व वयाचे दाखले वाटप करण्याच्या उपक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत आज कमिशन मंडळ इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते एकूण ४६ विद्यार्थ्यांना वयाचे आणि जातीचे दाखले देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात तहसीलदार वसावे यांनी सांगितले की, केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहणे पुरेसे नाही, तर समाजात वावरताना त्याचा उपयोग होणे महत्त्वाचे आहे. त्यांनी 'नावीण्यपूर्ण' उपक्रमाची माहिती दिली. तसेच, कुडाळ तालुक्यात २२६ जिल्हा परिषद शाळा आणि ३८ खाजगी शाळा असून, त्यापैकी कमिशन मंडळ इंग्लिश मीडियम ही पहिली शाळा आहे जिथे फक्त दोन दिवसांत ४६ विद्यार्थ्यांचे दाखले पूर्ण करून देण्यात आले.
या जलद कार्यवाहीबद्दल तहसीलदार वसावे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका शेख यांनीही उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










