
कुडाळ : 'निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणरायाच्या आरतीचा मान देऊन जो आदर दिला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. आजची परिस्थिती आणि १६ वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आमच्या कुटुंबांमध्ये जेवढी टोकाची कटुता होती, आता तेवढ्याच टोकाची आपुलकी आहे,' असे भावुक उद्गार राज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले.
सिंधुदुर्गात आल्यानंतर निलेश राणे यांनी दाखवलेली आपुलकी मी कधीही विसरणार नाही. एखाद्या झाडाखाली सावलीसाठी बसलेला कोकणी माणूस त्या झाडाला विसरत नाही, कारण त्या झाडाने त्याला सावली दिलेली असते. त्याचप्रकारे राणे कुटुंबियांनी दाखवलेली आपुलकी माझ्या कायम स्मरणात राहील, असे कदम म्हणाले.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी गणरायाकडे प्रार्थना
कोकणाच्या विकासासाठी गणरायाने आम्हाला दोघांनाही सद्बुद्धी व शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. सिंधुदुर्गात आल्यावर निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः दत्ता सामंत यांनी, मला नवीन ऊर्जा दिली, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.