
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात एकूण 100 विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या सायकलींचे वाटप करण्यात आले. लिंगेश्वर विद्यालय हे ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक विद्यार्थी तीन ते चार किलोमीटर पायी चालत शाळेत येतात. अशा होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने किशोर पाटकर यांनी हा उपक्रम राबवून एक स्तुत्य पाऊल उचलले आहे.
या सायकलमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे सोपे होणार असून, त्यांचा वेळही वाचणार आहे. किशोर पाटकर यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजय पडते यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.