
पणदूर : कुडाळ तालुक्यातील पणदूर आणि कडावल दशक्रोशीत शनिवारी सायंकाळी ११ दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया!पुढच्या वर्षी लवकर या!! गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा जय घोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. पणदूर, डिगस, अणाव, वेताळबांबर्डे, हुमरमळा, आवळेगाव, कडावल, भडगाव, निरूखे, पांग्रड, वर्दे, घोडगे, सोनवडे, भरणी, जांभवडे, कुसगांव, गिरगाव, हिर्लोक सह दशक्रोशीत ढोल ताशांचा गजरात,फटाक्यांच्या आतिषबाजीत गणपती बाप्पांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला.
शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही काही ठिकाणी बाप्पांच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. पणदूर व कडावल दशक्रोशीतील हातेरी नदी, पिठढवळ नदी, डिगस चोरगेवाडी व तळेवाडी तलाव, यांसह नदी, ओहोळ आदी ठिकठिकाणी गणेश मुर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणरायांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त भाविक उपस्थित होते.










