
कुडाळ : गणेशोत्सवादरम्यान कोकणातील गावात फुगड्यांच्या जागी सोशल मीडियावरील ट्रेंडने जागा घेतल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले. पूर्वी रात्रभर चालणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमांऐवजी, आजच्या तरुण पिढीने गणपतीसमोर व्हायरल गाण्यांवर रील्स बनवण्याला प्राधान्य दिल्याने, कोकणातील पारंपरिक संस्कृती हरवतेय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डिजिटलचा प्रभाव आणि बदलत्या प्रथा
आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक हातात मोबाईल आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. याच बदलाचा प्रत्यय यंदाच्या गणेशोत्सवात कोकणातही आला. गणपतीसमोर भजन-आरती, महिलांच्या फुगड्या आणि ओव्या, हा कोकणी गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, यावर्षी अनेक ठिकाणी तरुणाई डीजेच्या तालावर किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यांवर नाचताना आणि रील्स बनवताना दिसली. एका व्हायरल गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाल्यावर, अनेक गावांमध्ये तरुणांनी त्यावरच थिरकायला सुरुवात केली. यामुळे पारंपरिक कोकणी मनोरंजन आणि संस्कृती कुठेतरी मागे पडत असल्याचे दिसत आहे.
हरवत चाललेला कोकणी 'गावं पण'
पूर्वीच्या काळी रात्रभर महिलांच्या फुगड्या, ओव्या आणि पारंपारिक खेळांनी गावात एक वेगळीच चैतन्य निर्माण व्हायची. घरातील सर्व लोक एकत्र येऊन या कार्यक्रमांचा आनंद घेत असत. यामुळे आपसातील संबंध अधिक दृढ होत होते. आज मात्र सोशल मीडियाच्या प्रभावामुळे एकत्र बसून गोष्टी करण्यापेक्षा, प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. या नवीन ट्रेंडमुळे गावातील 'गावं पण' आणि जुनी प्रथा हरवत चालली आहे असं काहीस चित्र पाहायला मिळालं.










