कुडाळ : नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. इथल्या प्रसिद्ध श्री देव पाटेश्वर मंदिरातून पारंपरिक पालखी काढण्यात आली. नारळ अर्पण करण्याच्या या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे, कारण यामध्ये सर्वात आधी नारळ अर्पण करण्याचा मान सावंत भोसले कुटुंबाला आहे.
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेनुसार, सावंत भोसले कुटुंबातील व्यक्ती भगसाळ नदीत पहिला नारळ अर्पण करतात. त्यानंतरच इतर भाविकांना नारळ अर्पण करण्याची परवानगी असते. त्यामुळे या नारळी पौर्णिमेला सावंत भोसले कुटुंबीयांच्या नारळाला विशेष मान असतो.
श्री देव पाटेश्वर मंदिर हे सावंत भोसले यांच्या खाजगी मालकीचं असल्यामुळे त्याची संपूर्ण देखरेख करण्याची जबाबदारीही हेच कुटुंब सांभाळतं. याबाबतची माहिती सुंदर यशवंत सावंत भोसले यांनी दिली. या वर्षीच्या पालखी सोहळ्यानिमित्त कुडाळ पोलीस स्टेशनचे पीआय मगदूम यांनीही मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतले आणि हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रार्थना केली. तसेच, सुंदर सावंत भोसले यांनीही सर्वांनी मिळून हा उत्सव चांगल्याप्रकारे साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. नारळी पौर्णिमेचा हा सोहळा कुडाळच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.