
कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गाच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात शिवसेना आता आक्रमक झाली आहे. या रस्त्याच्या कामातील दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाचा निषेध करण्यासाठी १३ ऑगस्टला कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना नेत्यांनी केले आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी या महामार्गाच्या दुरवस्थेसाठी केंद्र आणि राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याच्या कामातील दिरंगाईसाठी दोषी ठरवले. 11 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गाची अवस्था आज अत्यंत वाईट आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी गणेश चतुर्थीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, पण वर्षभरानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. या रस्त्याच्या कामासाठी अनेक ठेकेदार बदलले गेले असून, त्यांनी निकृष्ट काम केले आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
संदेश पारकर यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांपासून हा रस्ता आहे त्याच स्थितीत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तरीही त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पूर्वी शिवसेनेने टोलनाक्याविरोधात आंदोलन करून जनतेचे 70 ते 75 कोटी रुपये वाचवले होते. आता याच समस्येवर आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
सतीश सावंत यांनी नितीन गडकरी यांच्या १०० वर्षे टिकणाऱ्या रस्त्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. मात्र, प्रत्यक्षात 15 वर्षांतच हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. या आंदोलनाबरोबरच पक्षीय नेत्यांच्या सांगण्यावरून काही अधिकाऱ्यांनी निवडक लोकांचे स्टॉल आणि दुकाने पाडल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाच्या या चुकीच्या कामांविरोधातही हे आंदोलन आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी माजी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी ठेकेदारांना जनतेच्या पैशातून निधी दिला जातो, पण ठेकेदार चांगले काम करत नाहीत. खड्डे बुजवून सरकार जनतेवर उपकार करत नाही असे उपरकर म्हणाले. या सर्व नेत्यांनी मिळून सरकारला या गंभीर समस्येची दखल घेण्याची मागणी केली असून, जर सरकारने यावर योग्य कार्यवाही केली नाही, तर गणेश चतुर्थीनंतर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.