LIVE UPDATES

रिक्षा पलटी..नर्सिंगच्या ६ विद्यार्थिनींसह ७ जखमी

रिक्षाचालक फरार
Edited by:
Published on: July 08, 2025 11:04 AM
views 444  views

कुडाळ : कुडाळ शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्ससमोरील वळणावर एक भरधाव रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूलच्या सहा विद्यार्थिनी आणि रिक्षा चालकाचा मित्र असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून फरार झाला.

अणावहुमरमळा येथून कुडाळच्या दिशेने येणारी ही तीनचाकी रिक्षा कुडाळ एसटी बस स्थानकाकडे जात असताना क्षितिज कॉम्प्लेक्सजवळ वळणावर आली आणि तिचा वेग जास्त असल्याने ती पलटी झाली. रिक्षाचा वेग खूप जास्त होता, असे जखमी विद्यार्थ्यांनी सांगितले. चालकाने यापूर्वीही दोन वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न केला होता.

अपघातात रिक्षातील सर्वजण बाहेर फेकले गेले. यामध्ये काळेसे येथील विद्यार्थिनी साक्षी म्हापणकर आणि भूमिका म्हापणकर या गंभीर जखमी झाल्या, तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. तसेच रिक्षा चालकाचा मित्र वैभव निकम याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

सर्व जखमींना तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी साक्षी म्हापणकर, भूमिका म्हापणकर आणि वैभव निकम यांना अधिक उपचारांसाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघात घडवल्यानंतर कणकवली येथील रिक्षा चालक हेमंत भोगले आपली रिक्षा घेऊन कणकवलीच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.