सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत कुडाळचं सर्वेक्षण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 06, 2025 15:26 PM
views 208  views

कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत चार सदस्यीय समिती मार्फत मंगळवारी 'अ' वर्गातील कुडाळ बसस्थानकाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने बस स्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छतेसह विविध व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली. 

    प्रादेशिक व्यवस्थापक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली पाहणीसाठी आलेल्या समितीमध्ये पुणे येथील एसटी महामंडळाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी दादासो गावडे, पत्रकार काशिराम गायकवाड आणि प्रवासी मित्र सौरभ पाटकर यांचा समावेश होता. यावेळी सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय लेखाधिकारी शिंदे, कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानक प्रमुख पल्लवी मोर्ये, वाहतूक नियंत्रक महादेव आंबेस्कर, वरिष्ठ लिपिक (प्रशासन) रुपेश टेमकर आदी उपस्थित होते. आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांनी समितीचे स्वागत केले.

     राज्य परिवहन महामंडळामार्फत संपूर्ण राज्यभरात स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबवले जात आहे. हे अभियान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबवले जात आहे. या अभियानांतर्गत राज्यातील एसटी बस स्थानकांची स्वच्छता, साफसफाई, स्वच्छतागृहे आणि कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची पाहणी करून त्यांना गुणांकन दिले जाते. त्यानुसार, कुडाळ आगाराच्या गांधीचौक येथील बसस्थानकातील विविध व्यवस्थापनाचे निरीक्षण करून गुणांकन करण्यात आले.