कुडाळ नगरपंचायतीची मान्सूनपूर्व आढावा बैठक

सर्व यंत्रणांना २४ तास 'अलर्ट' राहण्याचे आदेश
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 29, 2026 11:15 AM
views 44  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्यावतीने मंगळवारी सायंकाळी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात राबवायच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणांनी २४ तास सतर्क  राहावे, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिले.

या बैठकीत नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर आणि उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी शहरातील सर्व विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि शहराची सुरक्षितता जपली जावी, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याने विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरबाधित भागांवर लक्ष केंद्रित करून आरोग्य विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार ठेवावा आणि औषधसाठा मुबलक उपलब्ध ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या.

शहरातील ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत, तिथे तातडीने दुरुस्ती करावी. रस्त्यांवरील खड्डे बुजवून पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे साफ करावीत. तसेच, नाबरवाडी रेल्वे ब्रिज परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी धोकादायक वीज खांब व वाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करावी. तसेच, पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, आपत्कालीन बोट नादुरुस्त असल्याने ती तातडीने दुरुस्त करण्याबाबत प्रशासनाला पाठपुरावा करण्याचे सांगण्यात आले. याव्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय विभाग आणि अग्निशमन दलाच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीला मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेविका अक्षता खटावकर, ज्योती जळवी, नयना मांजरेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.