दिव्यांग बांधवांचे ढोलबजाव आंदोलन १ मे रोजी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 29, 2026 13:51 PM
views 11  views

सिंधुदुर्गनगरी : दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवत दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणित हक्क समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने १ मे (कामगार दिन) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ८ वाजता ढोलबजाव आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

ही समिती महाराष्ट्र राज्यात कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना न्याय व हक्क मिळवून देणे हा प्रमुख उद्देश आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

दिव्यांगांसाठी व्यवसायाकरिता शासनाच्या जागेतून किमान २०० चौ.फुट जागा उपलब्ध करून द्यावी

घरपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी

शासकीय नोकरीतील ५% दिव्यांग आरक्षणाचा अनुशेष तात्काळ भरून स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी

दिव्यांग पेन्शन वेळेवर व नियमित मिळावी

वितरित ई-रिक्षांच्या निकृष्ट दर्जाबाबत चौकशी करून योग्य न्याय द्यावा

जिल्हा परिषद ५% दिव्यांग निधीचे तात्काळ वाटप करावे

समाजकल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ही पदे त्वरित भरावीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र दिव्यांग भवन उभारण्यात यावे

या सर्व मागण्यांसाठी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव, तसेच त्यांच्यासाठी कार्यरत संस्था, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.