कुडाळ MIDCला उदय सामंत यांच्या प्रयत्नांनी नवी संजीवनी

७० नवीन उद्योगांची भर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 08, 2025 13:53 PM
views 52  views

कुडाळ : एकेकाळी मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे आणि दळणवळणाच्या कमतरतेमुळे अडकलेली कुडाळ एमआयडीसी (MIDC) आता आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रकाशमान झाली आहे, असे प्रतिपादन कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी केले.

१९७७ साली पार्ट्स मुंबई आणि पुणे शहरांना पर्याय उपलब्ध व्हावा या हेतूने कुडाळ एमआयडीसीची स्थापना झाली. मात्र, पाणी, वीज, आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याने अनेक भूखंड घेऊनही उद्योगांची वाढ झाली नाही. जुन्या एमसेबी (MSEB) मुळे उद्योजकांना अतोनात हाल सोसावे लागले.

सामंत यांच्यामुळे MIDC 'प्रकाशमान' : अध्यक्ष होडावडेकर यांनी सांगितले की, एकेकाळी १८ HP कनेक्शन देण्याची क्षमता नसलेल्या एमआयडीसीला उदय सामंत यांनी ३७ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. या निधीमुळे एमआयडीसीतील मूलभूत सुविधांची कामे झाली, परिणामी केवळ ३ वर्षांत ७० नवीन उद्योग उभे राहिले. यापूर्वी अनेक उद्योग बंद पडत होते, पण आता एमआयडीसी नक्कीच विकसित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उदय सामंत हे न बोलता काम करत राहिले. त्यांच्यामुळेच कुडाळ एमआयडीसी प्रकाशमान झाली आणि आजचा दिवस आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे मोहन होडावडेकर म्हणाले.

अविकसित भूखंडांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज : एमआयडीसीच्या पुढील विकासासाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. जे भूखंड अनेक वर्षांपासून अडकलेले आहेत आणि वापरले जात नाहीत, ते भूखंड जर नवीन आणि उत्साही उद्योजकांना उपलब्ध करून दिले, तर कुडाळ एमआयडीसीचा विकास अधिक वेगाने होईल. भविष्यात ही एक मोठी औद्योगिक वसाहत होईल, असा विश्वासही होडावडेकर यांनी व्यक्त केला.