
कुडाळ : समाजात जी गरीब मुले आहेत, जी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशांसाठी जिव्हाळा सेवाश्रमाने वाटचाल केली आहे. भविष्यात जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येतील या दृष्टीने प्रयत्न करू. आरोग्य केंद्र, गायन वादनसाठी संगीत केंद्र तसेच गोशाळासह इतर रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प असल्याचे पत्रकार परिषदेत जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुरेश उर्फ दादा बिर्जे यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील माडयाचीवाडी रायवाडी येथील निराधारांसाठी जिव्हाळा सेवाश्रम गेली दहा वर्षे परमेश्वररुपी मानवसेवा करत आहे. आज या जिव्हाळा सेवाश्रमात 25 वृद्ध असून त्यांची सेवा करण्यासाठी बिर्जे परिवारसह त्यांचा ट्रस्टी कार्यरत आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना दादा बिर्जे म्हणाले, अन्य कोणत्याही समाजात वृद्धाश्रम नाहीत वृद्धाश्रम असू नयेत या मताशी मी ठाम आहे. पण समाजात जे घडत आहे ते नाकारता येत नाही वय झाल्यानंतर आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याची संख्या वाढत आहे. हे चित्र बदलले पाहिजे ज्याला कोणीच आधार नाही, निराधार आहेत अशांसाठी वृद्धाश्रम असावेत पण मोठी फॅमिली असताना केवळ आपल्याला एकांतात राहता यावे आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवावे यासाठी वृद्धाश्रम असू नयेत दरम्यान श्री सुरेश बिर्जे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रम हे दहाव्या वर्षात वाटचाल करत आहे. आज या सेवाश्रमात 25 वृद्धांची सेवा आमचा बिर्जे परिवारसह ट्रस्टी करत आहे. त्यांची सेवा म्हणजे एक परमेश्वरी सेवाच आहे. भविष्यात जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून जी गरीब मुले आहे ती शिक्षणापासून वंचित राहू नयेत अशांना मोफत शिक्षण देण्याचे काम जिव्हाळा माध्यमातून केले जाईल. त्याचबरोबर या जिव्हाळा सेवाश्रमात आरोग्य केंद्र तसेच संगीत केंद्र होण्याच्या दृष्टिकोनातून आमची मोहीम यशस्वी झालेली आहे.याठिकाणी विविध प्रकारच्या 25 गाईंची गोशाळा कार्यान्वित आहे. या गोशाळेच्या माध्यमातून रोजगारभिमुख उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या ठिकाणी येणारा विद्यार्थी हा जिव्हाळाच्या माध्यमातून रोजगाराच्या दिशेने वाटचाल करेल या उद्देशाने रोजगारभिमुख उपक्रम सुद्धा या ठिकाणी राबवण्याचा आमचा मानस आहे. जिव्हाळा सेवाश्रम हा आमच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे वास्तव लाभलेली भूमी आहे. या धर्तीवर गोवर्धन प्रतिकृती साकारण्याचा सुद्धा आमचा संकल्प आहे. गेली दहा वर्षे जिव्हाळाच्या माध्यमातून ते निराधार नाहीत, तर आमच्या कुटुंबातील घटक आहेत. त्यांना चांगली सेवा देता यावी एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होत आहेत. भविष्यातही त्यांना चांगली सेवा देण्याचे काम आम्ही निश्चितच करू असे सुरेश बिर्जे यांनी सांगितले.
गेली 40 वर्षे बांधकाम व्यवसायात काम करताना या ठिकाणी प्रामाणिक सेवा दिली, तीच सेवा या ठिकाणी प्रामाणिकपणे देऊन उर्वरित आपले आयुष्य हे समाजातील उपेक्षित असणाऱ्या घटकांसाठी जे निराधार आहेत. त्यांच्यासाठी देता यावी या उद्देशानेच ज्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल उभे राहू शकले असते अशा ठिकाणी केवळ नी केवळ वृद्धांसाठी जिव्हाळा सेवाश्रमची मुहूर्तमेढ रोवली गेली असल्याचे श्री बिर्जे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे, संदीप बिर्जे, नाना राऊळ, उमेश देसाई, संतोष सांगवे, आबा गवळी, बाबा गावडे, अरुण परब ,जे पी प्रभू आदी उपस्थित होते.










