
कुडाळ : येथील एमआयडीसीच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी असोसिएशन सातत्याने प्रयत्नशील आहे. विशेषतः औद्योगिक वसाहतील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना खंडीत व कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा, विस्तारीत औद्योगिक वसाहतीत पथदीप नसल्याने उद्योजकांची होणारी गैरसोय, जुने व कालबाह्य झालेले विद्युत खांब आणि बंद असलेले दिवे. यांमुळे त्याठिकाणी काळोखाचे साम्राज्य असल्याने अनेक अनैतिक प्रकार चालत होते. त्यामुळे सर्व उद्योजकांमध्ये असुरक्षिततेची भावना होती.
कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन मलीक यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन उद्योजकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक विचार करून, त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबधितांना दिले. औद्योगिक वसाहतील सर्व पथदिवे यांचे नुतनीकरण, दुरूस्ती व पुढील पाच वर्षांची देखभाल यासाठी तब्बल ६ कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली असून तसे त्यांनी असोसिएशनला कळविले आहे.
असोसिएशनच्या मागणीचा विपीन मलीक व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घेतला याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.